{ads}

6/recent/ticker-posts

जलयुक्त शिवार अभियान

जलयुक्त शिवार अभियान

जलयुक्त शिवार अभियान

महाराष्ट्र राज्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे निर्माण होणारी पाणी टंचाई, दुष्काळसदृष्य परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी व सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता शाश्वत स्वरूपात होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व विभागांच्या समन्वयाने जलसंधारणाच्या सर्व योजना एकात्मिक स्वरूपात राबविण्याच्या हेतूने, महाराष्ट्र शासनाने 'सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त  महाराष्ट्र करण्यासाठी व टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करून पाण्याची उपलब्धता ग्रामीण परिसरात वाढविण्यासाठी 'जलयुक्त शिवार अभियान' डिसेंबर २०१४ पासून सुरू केले आहे.


अभियानाचा उद्देश :
१) पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे शिवारातच अडविणे.
२) गावाच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. ३) राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे.
४) शेतीसाठी संरक्षित सिंचन व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.
५) ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनाचे पुनर्जिविकरण करून पाणी पुरवठ्यात वाढ करणे.
(६) भूजल अधिनियमाची अंमलबजावणी करणे.
७) विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे.
८) पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.
९) अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता वाढविणे.
१० ) अस्तित्वातील जलस्रोतातील गाळ लोक सहभागातून काढून पाणी साठवण क्षमता वाढविणे.
११) वृक्षलागवडीस प्रोत्साहन देऊन वृक्षलागवड करणे.
१२) पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव जागृती निर्माण करणे
(१३) शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम / काटकसरीने वापर करण्यास प्रोत्साहन देणे व जनजागृती करणे.
१४) पाणी अडविणे / जिरवणे बाबत लोकांना प्रोत्साहित करून लोक सहभाग वाढविणे.
१५) माथा ते पायथा कामे घेऊन गावाचा पाणलोट समद्ध करणे.


अभियानाची व्याप्ती :
सदर अभियानात शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग व खाजगी उद्योजक (CSR) इ. कडील उपलब्ध निधीतून राज्यातील टंचाई सदृश्य तालुक्यात व उर्वरित भागात भविष्यात टंचाई भासू नये यासाठी जलसंधारणाच्या योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यावर भर देण्यात आला आहे.


अभियानांतर्गत हाती घ्यावयाची कामे:
1) पानलोट विकास कामे
२) साखळी सिमेंट बंधाऱ्याची कामे, नाला खोलीकरण व रुंदीकरणासह करणे.
३) जुन्या जलस्त्रोताचे पुनरुज्जीवन करणे
४) अस्तित्वातील लघुपाटबंधारे केटी वेअर/ साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे.
५) पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती व नूतनीकरण करणे.
६) पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिश व निजाम कालीन तलाव, माती नालाबांधा यातील गाळ काढणे
७) मध्यम व मोठ्या प्रकल्पांचा सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे.
८) छोटे ओढे नाले जोड प्रकल्प राबविणे
९) उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे
१०) पाणी वापर संस्था बळकट करणे
११) कालवा दुरुस्त करणे.
१२) विहीर पुनर्भरण करणे.


निधीची उपलब्धता
सदर अभियान राबविण्यासाठी विविध योजनांतर्गत उपलब्ध असलेला निधी, लोकसहभाग, खाजगी उद्योजक यांचेकडील CSR निधीतून कामे होणे आवश्यक आहे.


अभियानाचा आराखडा तयार करणे :
जलयुक्त शिवार अभियान राबविणेसाठी गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या एकत्रित आराखडा तयार करणे आवश्यक आहे.
१) अस्तित्वात असलेली जलसंधारणाची कामे पूर्ण करणे.
२) नव्याने घ्यावयाची कामे
३) अस्तित्वात असलेल्या कामांची दुरुस्ती व गाळ काढणे इ. चा समावेश करण्यात आलेला आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडा तयार करावा. गाव स्तरावरील विविध कामे हाती घेताना 'व्हिलेज पोटेंशियल मॅप' मध्ये दर्शविण्यात आलेली कामे घेणे अत्यंत आवश्यक आहे. सदर एकूण कामात ७०% कामे क्षेत्र उपचाराची व ३०% इतर कामे घेण्यात यावीत. आराखडा तयार करण्यापूर्वी गाव शिवार फेरी करून कामे निश्चित होतात त्यानुसार तयार आराखड्यास ग्रामसभा, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभागस्तरीय समितीची मान्यता आवश्यक आहे. तसेच, गावाचे पाण्याचे अंदाज पत्रक / ताळेबंद तयार करून त्या प्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना करणे.

Post a Comment

0 Comments